ध्येय निश्चिती
विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 13-Dec-2022
Total Views |
वयाच्या 23 व्या वर्षी विष्णुबुवांना आपला जन्म परोपकारासाठी असल्याची र्इश्वरी प्रेरणा झाली आणि आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी नाशिकला प्रयाण केले. तेथे सप्तश्रृगींच्या डोफ्लगरावर कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. लोकांना आपल्या उज्वल आणि श्रेष्ठ धर्माची अोळख करून देण्यासाठी आपल्याला लाभलेल्या वेदोक्त धर्माचा मार्ग आपल्या बांधवांनाही दाखविला पाहिजे याची त्यांना खात्री पटली. धर्माच्या नावाखाली माजलेल्या अनाचाराचे अवास्तव स्तोम मोडून काढण्याचे आणि विदेशी पाखंड मतांचे खंडन करून वेदोक्त धर्माची पुनःस्थापना करण्याची त्यांना परमेश्वरी आज्ञा झाली. त्यानंतर विष्णुबुवा नाशिकमार्गे पंढरपूरला आले. तेथे त्यांनी भावार्थ रामायणाची दोन पारायणे केली आणि लोकांना वेदोक्त धर्माची महत्ता सांगण्यास प्रारंभ केला. त्यांनी वैदिक धर्माचे वास्तव स्वरूप जनतेसमोर आणण्यासाठी ‘भावार्थ सिंधू’ (1856) ग्रंथ लिहिला. येथे त्यांचा श्री. महादेवशास्त्री कोल्हटकर यांच्याशी परिचय झाला. त्यांच्या सांगण्यावरून विष्णुबुवांनी सांगली, मिरज, वार्इ, सातारा, पुणे, अहमदनगर व कोल्हापूर येथे वेदोक्त धर्मावर व्याख्याने दिली. त्यानंतर द्वारकेला जाण्यासाठी म्हणून सप्टेंबर 1856 मध्ये मुंबर्इत आले. मुंबर्इमध्ये त्यांना ख्रिश्चन मिशनऱ्यांचा धर्म आणि सेवा यांच्या नावाखाली सुरु असलेल्या कुटील कारवायांची अोळख झाली. इंग्रजांनी केवळ राजसत्ताच बळकावलेली नाही, तर मिशनऱ्यांव्दारे हिंदू समाजावर त्यांचे सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमण चालू आहे, हिंदूचे धर्मांतर करण्याचे त्यांचे षडयंत्र आहे याची जाणीव होऊन त्याला प्रखर विरोध करून आळा घालण्याचा त्यांनी निर्धार केला.वेदोक्त धर्मरक्षण अर्थात हिंदू धर्मरक्षण :ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू धर्मग्रंथांच्या हस्तलिखितांमधून ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्याला उपयोगी पडतील अशी हिंदू धर्मातील दोषस्थळे निवडून काढलेली होती आणि त्या आधारे ते हिंदू धर्मावर खोडसाळ टीका करत होते. विष्णुबुवांनी याला प्रत्युत्तर म्हणून लहान मोठया बैठकांतून समाज प्रबोधनाला सुरूवात केली. प्रत्येक शनिवारी गिरगावातील प्रभू सेमीनरीत त्यांची व्याख्याने होत असत. अशा एकूण 50 सभा झाल्या. या सभांच्या माध्यमातून त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या अश्लील आणि खोडसाळ टिकेचा प्रभावीपणे प्रतिवाद केला. विष्णुबुवांचे वक्तृत्व आणि वादविवाद कौशल्य अत्यंत प्रभावी होते. 15 जानेवारी 1857 ते 28 मे 1857 या कालावधीत प्रत्येक गुरूवारी संध्याकाळी मुंबर्इच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांच्या ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत जाहीर चर्चा, सभा झाल्या. तेथे ख्रिश्चन मिशनरी जी. जॉर्ज बोवेन येत असे. त्याने ह्या चर्चांचे संकलन ‘Discussions By The Seaside’ (1857) ह्या पुस्तकात केले आहे. त्याचा मराठी अनुवाद ‘समुद्रकिनारीचा वादविवाद’ (1872) मध्ये झाला. विष्णुबुवांनी कलकत्ता, चेन्नर्इ, वाराणसी येथे जाऊन आपल्या समाजप्रबोधनाव्दारे हिंदू धर्मरक्षणाचे आणि प्रसाराचे महान कार्य केले आहे.