विष्णुबुवांना त्यांच्या पवित्र कार्यामध्ये सर जीजीभॉय जमशेटजी, जगन्नाथ शंकरशेठ, हरी केशवजी, शेठ गोकुळदास तेजपाल, भाऊदाजी लाड, विनायकरावजी वासुदेव, नारायण दिनानाथजी, दादोबा पांडुरंग, दादाभार्इ नवरोजी अशा अनेक महानुभावांची साथ मिळाली. विष्णुबुवांना अक्कलकोट मुक्कामी श्री. स्वामी समर्थांचा सहवास, मार्गदर्शन आणि कृपाप्रसाद लाभला होता. गिरगाव, मुंबर्इ येथे 18 फेब्रुवारी 1871 (महाशिवरात्री - माघ वद्य चतुर्दशी शके 1792) रोजी त्यांचे निधन झाले. केवळ 46 वर्षांच्या आयुष्यात, हालअपेष्टांची चिंता न करता, स्वकीय आणि परकीय लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून आणि अवहेलना स्विकारून विष्णुबुवांनी समाजप्रबोधनाचे आणि हिंदुधर्म रक्षणाचे महान कार्य केले. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या राष्ट्रवादाचे आणि सामाजिक हिंदुत्वाच्या संकल्पनेचे विष्णुबुवा हे उद्गाते आहेत.