समतावादी आणि राष्ट्रवादी विचार

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    13-Dec-2022
Total Views |
इंग्रज शासन काळात भारतात मोठया प्रमाणात यांत्रिकीकरण झाले. कारखानदारी निर्माण होऊन कामगार वर्ग उदयास आला. विष्णुबुवांनी कामगारांच्या दयनीय अवस्थेचे चित्रण आणि त्यांच्या संबंधीचे विचार सुखदायक राज्यप्रकरणी निबंध (Essays On Beneficent Government) या ग्रंथात मांडले आहेत. त्यांचा हा ग्रंथ म्हणजे एक आदर्श राज्यकल्पना आहे. त्यांनी या ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून घेतले आणि ते 1869 मध्ये प्रकाशित केले. त्याच्या 10,000 प्रती छापून इंग्लंडची राणी व्हिक्टोरियासह देशविदेशातील गणमान्य व्यक्तिंना पाठविले. विष्णुबुवांनी रचिलेल्या अन्य उल्लेखनीय ग्रंथांमध्ये चतुःश्‍लोकी भागवत याचा अर्थ (1867), सहजस्थितीचा निबंध (1868) आणि त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या वेदोक्त धर्माचा विचार व ख्रिस्तीमत खंडन (शिकवणुकीचे सार; 1874), सेतुबंधनी टीका (1890) यांचा समावेश होतो. ‘सेतुबंधनी टीका’ हे भगवद्गीतेवरील निरूपण आहे. ‘अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा सेतू’ असे ह्या टीकालेखनाचे स्वरूप आहे. भावार्थ सिंधू या त्यांच्या ग्रंथाचे गुजराथी भाषेत आणि वेदोक्त धर्मप्रकाश या ग्रंथाचे भोजपुरी भाषेत भाषांतर झाले. विष्णुबुवांनी प्रबोधनासोबत गावोगावी वाचनालये, वर्तमानपत्रे स्थापण्यासाठी पुढाकार घेतला, प्रोत्साहन दिले. विष्णुबुवांच्या विचारप्रर्तक व्याख्यानांमुळे हिंदू आणि पारशी समाजात मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली आणि त्यांचा धर्माभिमान जागृत झाला. त्यामुळे ख्रिश्‍चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रचाराला आळा बसला, मिशनऱ्यांचा चौखूर उधळलेला वारू रोखला जाऊन हिंदू आणि पारशी समाजाची धर्मांतरे थांबली.