१४ जुलै २०२६
🪷*॥श्री॥*🪷
मान्यवर,
सप्रेम नमस्कार.
कालपर्यंत या नवीन शैक्षणिक सत्रात विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राकडून माणगाव तालुक्यातील १६ आणि सुधागड तालुक्यातील २ अशा एकूण
एकूण १८ शाळांमधील १२१६ विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य - वह्या, पुस्तके, चित्रकला साहित्य, कंपास पेटी, टिफिन डबा, दप्तरे, छत्र्या, वॉटर फिल्टर देण्यात आले आहे. अजून ९ शाळांमधील मुलांना साहित्य द्यायचे आहे.
आपले काम केवळ साहित्य वाटपापुरते नाही. तर संपर्कित शाळांमध्ये मुलांवर उत्तम संस्कार होण्यासाठी सण, उत्सव, उत्साहवर्धक उपक्रम साजरे करणे आणि दैनंदिन पाठांतर करण्याचा आपला आग्रह आहे. आषाढ आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमा आणि रक्षाबंधन या उत्सवांबरोबरच आषाढ अमावस्या (दीप अमावस्या) शाळांमध्ये साजरी करण्याचे आवाहन आपण शिक्षकांना केले आहे. ज्या शाळांच्या जवळच्या वस्तीवर आपल्या संस्कार शाळा चालतात तेथील मुले शाळेमध्येसुद्धा गायत्री मंत्र, श्लोक म्हणू लागली आहेत.
काही शाळांमध्ये साहित्य वाटपाच्या वेळी पालक उपस्थित होते. मुलांची स्वच्छता, त्यांचे आरोग्य, मुलांनी शाळेत नियमित उपस्थित राहण्याचा आग्रह याबद्दल पालकांशी चर्चा झाली.
देशाचे सुसंस्कृत आणि स्वाभिमानी नागरिक घडविण्याच्या कार्याची पायाभरणी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये व्हायला हवी. परंतु विकासाचे स्वप्न पाहताना आपले शिक्षणाकडे खूप दुर्लक्ष झाले आहे. (१) मराठी भाषेची हेळसांड (२) इंग्रजीचे आकर्षण (३) ढासळलेली शिक्षण व्यवस्था - शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रम (४) गुरु शिष्य परंपरेचा ऱ्हास (५) रोजगारासाठी होणारे स्थलांतर (६) ग्रामीण शाळांमधील रोडावणारी पट संख्या (७) भ्रष्टाचार (८) ढिम्म प्रशासन आणि राजकारणी (९) शिक्षण क्षेत्रातील अनैतिकता या भीषण समस्यांमधून आपण कोणती युवा पिढी घडवणार आहोत ? हा प्रश्न केवळ ग्रामीण मराठी शाळांपुरता नसून शहरी आणि महानगरांतील सर्व माध्यमांच्या शाळांना लागू आहे. सर्वांनी याचा विचार करायला हवा.
विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राकडून होणारे प्रयत्न समुद्राच्या पाण्याच्या एका थेंबाएवढे आहेत. अनुकूल बदल घडण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची आणि अनेक हातांची आवश्यकता आहे.
सर्वाना नमस्कार आणि शुभेच्छा. 🌺🌱🪷
सुरेश गोखले
95793 72797
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- शैक्षणिक साहित्य वाटप