बालपण
विष्णुबुवा ब्रह्मचारी हे 19 व्या शतकातील महान समाज सुधारक, हिंदू धर्मरक्षक-प्रचारक म्हणून अोळखले जातात. त्यांचे मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले. रायगड जिल्ह्यातील शिरवली (ता. माणगाव) या गावी 20 जुलै 1825 रोजी (नागपंचमी-श्रावण शु.5 शके 1747) एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आर्इचे नाव उमाबार्इ. ते पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वयाच्या नवव्या वर्षी ते जमीन महसूल खात्यात कामाला लागले. परंतु घरच्या अडचणींमुळे त्यांना नोकरी सोडून आपल्या आर्इच्या मदतीसाठी घरी यावे लागले. पुढे त्यांनी महाडला एका किराणा मालाच्या दुकानात काम केले. त्यानंतर 13 - 14 व्या वर्षी साष्टी तालुक्यातील सीमाशुल्क (कस्टम) खात्यात नोकरीस लागले. पुढे वसर्इ, कल्याण, भिवंडी व उरण इ. ठिकाणी त्यांनी नोकरी केली. त्यांचा स्वभाव धार्मिक आणि अध्यात्मिक होता. त्यामुळे प्रवचन, कीर्तन व भजन यात ते मोठया आवडीने सहभागी होत असत. त्याचप्रमाणे पांडवप्रताप, हरिविजय, ज्ञानेश्वरी, दासबोध अशा अनेक धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता.