..ही राजनीति आहे!

वरील दोन्ही निबंध ज्यांना पूर्ण वाचायचे असतील त्यांच्यासाठी एक पुस्तिका उपलब्ध आहे.

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    10-Mar-2023
Total Views |

loksatta
 
 
अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- विष्णुबुवा ब्रह्मचारी!
बाबा पदमनजींच्या ख्रिस्ती धर्मस्वीकारामुळे बरीच खळबळ झाली, त्यात त्यांनी पुस्तके लिहून हिंदू धर्मातील दोषस्थळे दाखवून देण्यास सुरुवात केली होती. त्यावर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. त्यात विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. हे बाबांचे समकालीन. त्यांचे मूळ नाव विष्णु भिकाजी गोखले. जन्म सध्याच्या रायगडमधील शिरवलीतला. घरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या नवव्या वर्षांपासून त्यांना विविध कामे करून घराला हातभार लावावा लागला. पुढे १८४७ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी आत्मसाक्षात्कारासाठी घर सोडले. सप्तशृंगीच्या डोंगरावर त्यांनी साधनेस सुरुवात केली. तेथे त्यांना ‘पाखंड मताचे खंडन करून वैदिक धर्माची पुन:स्थापना करावी’ असा साक्षात्कार झाला. तेव्हापासून त्यांनी वैदिक धर्माच्या प्रचारास प्रारंभ केला. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही ते भाषणे व प्रवचने देण्यासाठी जाऊ लागले. १८५७ पासून मुंबईच्या समुद्रकिनारी दर गुरुवारी त्यांचे ख्रिस्ती मिशनऱ्यांशी वादविवादसत्र होऊ लागले. ते सर्व धर्मीयांना खुले असे. या ठिकाणी झालेली त्यांची भाषणे रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी १८९० मध्ये संपादित केलेल्या ‘समुद्रकिनारीचा वादविवाद’ या पुस्तकात वाचायला मिळतात.
हे सर्व असले तरी, विष्णुबुवांची खरी ओळख आहे ती त्यांच्या ‘वेदोक्तधर्मप्रकाश’ या ग्रंथामुळे. १८५९ मध्ये प्रकाशित झालेल्या या सातशेहून अधिक पृष्ठांच्या ग्रंथात त्यांच्या विचाराचे सार आले आहे. या ग्रंथात एकूण २५ प्रकरणे होती. त्यात वैदिक धर्माचे विवेचन केले आहे. यात त्यांनी वैदिक धर्माला गतवैभव मिळवून देण्यासाठी औद्योगिक प्रगती, साक्षरता प्रसार, पुनर्विवाहास मान्यता, अस्पृश्यतेचा बीमोड आदी अनेक बाबींचा पुरस्कार केला आहे. या ग्रंथातील १५वे प्रकरण ‘राजनीति’ या शीर्षकाचे आहे. त्यात ते राज्यव्यवस्था कशी असावी याचे मार्गदर्शन करतात. त्यातील हा काही भाग पाहा-
‘‘कोणीही राज्याने राज्यकारभार चालविण्याच्या कामांत अविच्यारी असे जे अनेक मतांचे मताभिमानी, व द्वेष्टे, त्यांना घेऊं नये, कारण ते मनुष्य मताभिमानाने मनुष्यमात्रांत वैर उत्पन्न करितात. यास्तव कोणीही राजा असो, त्याणें मनुष्यमात्रांतून वैर दूर होईल अशा तजवीजीने राज्यकारभार चालवावा, व राज्यकारभार चालविणारे कामगार वंशपरंपरा नेमूं नयेत; परंतु ज्या मनुष्यांनी एकाकी प्रवास केला आहे, व ज्यांना गरीब, व श्रीमंत, व नीच, इत्यादि सर्व मनुष्यांचीं कर्मे माहित आहेत, व सुख दु:खें माहित आहेत, व ज्यांणी परोपकार करण्याचे कामांत घ्यावे तसे श्रम घेतले आहेत, व ज्यांना सर्व मतें माहित आहेत, व जे द्रव्यलोभी नाहींत, व जे न्यायाचे कामांत पक्षपात धरणार नाहींत, अशा अशा लक्षणांचे मनुष्य कोणत्याही जातीचे ह्मणजे जमातीचे असले तरीही, त्यांना राजाने पक्षपात न धरितां कामदार नेमावे, व जगांत शांती राहील असे कायदे ह्मणजे नियम करीत जावे. व राजानेही असें समजावें कीं मीही एक कामदार आहें, यास्तव मलाही सर्व प्रजेंतील मनुष्यांपेक्षां उत्तम रीतीने सर्व कारभारांत बिनचूक वागलें पाहिजे, व पक्षपात अगदींच टाकला पाहिजे, व धर्माच्या गोष्टी ऐकून मनोमय ठेविल्या पाहिजेत; परंतु मुखाने उच्चार करणें अगदीं उपयोगीं नाहीं, असें पक्कें समजून वागलें पाहिजे. ही राजनीति आहे.राजाने सर्व मनुष्यांस मजूरी व अन्नवस्त्र मिळावें, अशासाठीं देशोदेशीं जगाला सुखोपयोगी असे नवीन नवीन कारखाने काढावे, व जुने कारखाने सुधारावे, व मंडळ्या नेमून त्या कारखान्यांचा बंदोबस्त राखीत जावा. व हरएक मजूराला किंवा कामगाराला दररोज, किंवा दरमहिन्याचे महिन्यास, ठरविलेल्या मजूरीचा पैका देत जावा. व मजूराचा पैका जास्ती जास्ती दिवस ठेऊंनये, कारण ताहान लागल्यावर जसें आपणास होतें, त्याहून मजूराचा पैका जास्ती दिवस ठेविला तर मजूरास अधिक दु:ख होतें, यास्तव मजूराचा व कामगाराचा पैका वर लिहिलेल्या मुदतीबरोबर द्यावा. व कोणीही मजूराचा मजूरीचा पैका अपहार करणार नाहीं असा पक्का बंदोबस्त ठेवावा. याप्रमाणें कीं रोगाने आपल्या शरीराचा नाश करूं नये ह्मणून जसें आपण शरीरास जपतों, त्याहून मजूराचा पैका कोणी बुडवूं नये ह्मणून अधिक जपत जावें..
देवळांत किंवा तीर्थक्षेत्रांत पूजारी किंवा कारभारी, इत्यादि वतनादार करून ठेऊं नये, कारण तसें केल्यांत द्रव्यलोभाने भक्तीचा नाश होतो. याप्रमाणेंच वेदोक्त क्रियाकर्मे चालविणारा वंशपरंपरेचा नसावा. कारण वंशपरंपरा असला तर तो अडाणी असला, अथवा वाईट असला, तरीही त्याच्याच हातून कर्मे करून घ्यावीं लागतात; यामुळें वेदोक्त क्रियाकर्मे चांगल्या रीतीनें चालत नाहींत, व सर्व वैदिक ब्राह्मणांस दान हा जो धर्माचा अंश तो पोंचत नाहीं यास्तव तसें नसावें.
चौघडा, किंवा नगारा, किंवा एकमेकांचा शब्द एकमेकांस ऐकूं येणार नाही अशीं अशीं वाद्यें, देवळापुढें किंवा गांवाच्या मध्यभागीं, रात्रीस किंवा दिवसास, कोणीही वाजवूं नये, कारण तशी संधी साधून हरएक ठिकाणीं दगेखोर लोक दगा करितात. कारण त्या वेळेस ज्या माणसावर दगेखोर लोक पडतात; त्याणे जरी आपल्या मदतीस कोणीतरी यावें ह्मणून हाका मारिल्या तरी व्यर्थ होतें, कारण वाद्यांच्या झपाटय़ांत त्या बिच्याऱ्याची हाक कोणासही ऐकूं जात नाहीं. यास्तव तसें होऊं नये, या कारणास्तव चौघडे, व नगारे, व ढोल, व झालरी, व तासे इत्यादि रणवाद्यें गांवांत कोणास वाजवूं देऊ नये, परंतु मंगलवाद्यें वाजविल्यास चिंता नाहीं..
प्रत्येक मनुष्यापासून राज्याने दरवर्षांस शांणव गुंजाभर रुप्याचा एक रुपया कर घ्यावा, अथवा त्याच्याइतकें घ्यावें. याप्रमाणें स्वत: राजा व कामदार इत्यादि सर्व मनुष्यांपासून कर घेऊन, त्या सर्व मनुष्यांचा मालमिळकतीचें, व व्यापाराचें, व प्राणाचें, व शेताचें. इत्यादिकांचें संरक्षण करावें आणि जमिनीवरील कर व दुसरे सर्व कर अगदीं काढून टाकावे व समुद्रांतील चोरांचे बंदोबस्ताकरितां समुद्रांतून होणाऱ्या व्यापारावर पृथकच कर ठेवावा..
शेतकीच्या वगैरे जमिनीवर, किंवा खुराकी सामानावर, किंवा लांकडांवर, किंवा गवतावर, पानांवर, किंवा प्यावयाचे पाण्यावर, इत्यादिकांवर राज्याचा कर मुळींच नसावा, कारण ते पदार्थ ईश्वरी देणगीचे आहेत; परंतु मनुष्यमात्राचे प्राणरक्षणार्थ प्रत्येक मनुष्यापासून दर वर्षांस एक रुपया कर राज्याने घ्यावा, व जन्म झाल्यापासून अक्रा वर्षे पूर्ण होतील तोपर्यंत दर मुलाचा दरसाल चार आणे कर त्यांच्या पोषणकर्त्यांपासून राज्याने घ्यावा. व बाराव्ये वर्षांचे आरंभापासून एकुणिसाव्ये वर्षांचे अंतापर्यंत दर मनुष्यापासून दर वर्षांस अर्धा रुपया कर घ्यावा. आणि राज्याने अन्य बंदोबस्ताकरितां पाण्यांतील, व जमिनीवरील अनेक व्यापारधंद्यांवर कर बसऊन, खर्चाचें मान पुरें करावें. ही राजनीती आहे..
युद्ध करणारी सेना, अथवा लेखन कामादिक अनेक कामे करणारी सेना, इत्यादि सैन्य राजाने बाळगावें. त्यांतील मनुष्यें अमुकच वर्णाची अथवा अमुकच वर्णापैकीं अमुकच जमातीचीं ह्मणजे जातीचीं असावीं असें नाहीं. मनुष्यमात्रांस त्यांच्या अकलेची, बलाची, व शौर्याची, परिक्षा घेऊन ठेवावें, त्यांत वर्मभेद किंवा वर्णभेदांतील ज्यातिभेद इत्यादि अटकाव नसावा, तरच सर्व जातीच्या प्रज्येला आमचें राज्य आमचें राज्य असा अभिमान राहतो, आणि शत्रुंचें अगदीं चालत नाहीं. व मनुष्यमात्रांचे अन्याय दृष्टोत्पत्तीस येतात, यामुळें नीतीनें शासन होतें.
राजकीय नियमांतील चाकर मनुष्यें, ह्मणजे शिपायापासून राज्यापर्यंत, व दासींपासून राणीपर्यंत, व वल्ही मारणारांपासून नाव चालविणारांपर्यंत, व घोडा धुणाऱ्यांपासून कचरा झाडणारांपर्यंत इत्यादि राजकीय नियमांतील चाकर मनुष्यांतून ह्य़ाला ह्मणजे लेखन वाचन ज्ञान नाहीं असे तर कोणीच नसावें. जे ज्या देशांत राजकीय नियम चालविणारे कामदार नेमावे, ते, त्या देशाचा रिवाज, व भाषा जाणणारे असून नीतिमान असावे.
राजा मेला, किंवा वृद्ध वगैरे कारणाने ठरावाप्रमाणें वेतन घेऊन बसला तर त्याच्या हाताखालचे जे मुख्य दाहा कामदार त्यांतून एक राजा नेमावा.. आतां राज्याच्या हाताखालचे मुख्य दाहा कामदार हेच कीं, न्यायाधीश पहिला, व कराचा पैका प्रजेपासून घेऊन प्रजेस त्यांची मिळकत वांटून देणारा, राजकीय माणसांचें वेतन देणारा, व द्रव्यसंग्रह ठेवणारा असा दुसरा, व सेनापती योत्धा तिसरा, व समुद्रांतील रक्षणकर्ता चवथा, व प्रजेच्या निर्वाहाची सामोग्री पूर्ण असावी ह्मणून व्यापारास उत्तेजन देणारा पांचवा व प्रजेचा धर्म रक्षण करणारा साहवा व प्रजेच्या दृष्टोत्पत्तीस न येणारीं इत्यादि कपटें उघडकीस आणणारा सातवा व अन्य राज्यांशी संबंध ठेवणारा आठवा व विद्यावृद्धी करणारा नववा व प्रजेच्या शरीररक्षणाचीं साधनें करणारा दाहावा, याप्रमाणें दाहा कामदार याणी राज्याच्या अमुमतीने आपआपलीं कामें चालवावीं. याप्रमाणें राज्यव्यवस्था ठेवावी..’’
येथे विष्णुबुवा वेदोक्त धर्माच्या संदर्भात राज्यव्यव्यस्थेचे विवेचन करतात. वैदिक धर्माच्या प्रतिपादनात ते समग्रता आणू पाहत होते, हे यातून जाणवेल. पुढे त्यांची राज्यविषयक मते अधिक व्यापक होत गेली. १८६७ साली आलेल्या त्यांच्या ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंधा’त ते दिसून येते. या निबंधातून विष्णुबुवांनी त्यांची आदर्श राज्याची कल्पना मांडली आहे. सर्व प्रजा म्हणजे एक कुटुंब अशी भूमिका त्यांनी येथे घेतली आहे. या निबंधातील हा अंश पाहा –
‘‘अहो लोकहो ऐका, जितक्या प्रदेशाचा जो राजा असेल तितक्या प्रदेशांतील प्रजेला राजानें असें समजावें कीं, ही सर्व प्रजा माझें एक कुटुंब आहे व मी ह्या सर्व प्रजारूपी कुटुंबाचा मालक आहें व जेवढी माझे ताब्यांत जमीन आहे तेवढी जमीन माझा एक बागच आहे. यास्तव ह्य़ा सर्व प्रजारूपी कुटुंबाचा तेवढय़ा बागांत ह्मणजे जमीनींत निर्वाह होऊन प्रजारूपी कुटुंब सर्व सुखी राहील अशी तजवीज केलीच पाहीजे. याप्रमाणें राजाचा विचार प्रथम असावा; ह्मणजे, राज्य हेंच एक घर व प्रजा हेंच एक कुटुंब असा भाव असावा.
याप्रमाणें सर्व प्रजा एक कुटुंब आहे. यास्तव त्या सर्व कुटुंबाला सुख व्हावें ह्य़ाविषयीं उद्योग करणाऱ्या राजाला प्रजेनें विनंती करावी कीं, जो हुकुम होईल त्याप्रमाणें वागण्यास आम्ही सर्व प्रजा सिद्ध आहों..
याप्रमाणें सर्व प्रजा एक कुटुंब व सर्व जमीन हाच एक बाग व त्यांतून जें जें निघेल तें तें सर्वाचें एक, याप्रमाणें राज्यव्यवस्था असली ह्मणजे सर्वाना सर्व उपयोग मिळतात. व सर्वाना उत्तम खावयास मिळतें व सर्वाना उत्तम विपुल वस्त्रें व अलंकार, भूषणें मिळतात व सर्वाना नाच, तमाशे, बैठकी पाहावयास सांपडतात व पालख्या व रथ व घोडे व हत्ती यांजवर सर्वाना वृद्ध अवस्थेंत पार्लमेंटच्या जागीं बसावयास मिळतें, यांमुळे कोणाला कांहीं, प्राप्त नाहीं असें होतच नाहीं, ह्मणून सर्व लोक पूर्णकाम होतात यामुळें कामाच्या अपूर्णतेनें क्रोध येणें हें शिल्लकच राहात नाहीं; आणि क्रोध नसल्यामुळें गुन्हा करणें किंवा गुन्हा करण्यास्तव मत्सर धरून बसणें यांचा लवलेशही राहात नाहीं, यामुळे हाच प्रजेचा व राजाचा खरोखर असावा तसा संबंध आहे..
गेला तो भूतकाळ व येणार तो भविष्यकाळ यांच्यामध्यें जी क्रियारहितता असते तो वर्तमानकाळ, त्या वर्तमानकाळाला ओळखणाऱ्या ज्ञानानें राहून जर भविष्यकाळाच्या भूतकाळाला आहे ह्मणणाऱ्या ज्ञानाला नाहींसेंच करून टाकाल तरच नवल, नाहींतर सर्व तुमचीं मतें तीं अज्ञानरूपी ढोंगें आहेत, परंतु वर्तमानकाळाच्या ज्ञानानें राहाण्याचा धर्म ह्या राजनीतीशिवाय स्थापित होणार नाहीं. हें माझें लिहिणें हातांनीं बोललेलें बोलणें आहे, तें कानांनीं ऐकण्याप्रमाणें डोळ्यांनी ऐकून जर माझें मन समजाल तर कृतकृत्य व्हाल. व ते तोंडानें केलेली प्रार्थना जर ईश्वर कानानीं अथवा नाकाशिवाय ऐकतो तर त्याला धूप, दीप, नैवेद्य अथवा वस्त्र अर्पण केलेलें तो इंद्रियांनीं अथवा इंद्रियांशिवाय ग्रहण करतो असें सिद्ध होत असून प्रार्थना करणारे आपणास श्रेष्ठ मानून मूर्तिपूजकांस कनिष्ठ मानतात, ही जी त्यांची गैरसमजूत व तज्जन्य मारामार होते, ती ह्य़ा राजनीतीशिवाय बंद होणारच नाहीं, व ह्य़ा राजनीतीशिवाय मनुष्यामात्र सुखी होणार नाहीं..’’
या निबंधातून विष्णुबुवांच्या समाजवादी मनोवृत्ती दिसून येतात. त्यावरून काही अभ्यासकांनी त्यांना ‘महाराष्ट्राचा पहिला समाजवादी’ असेही म्हटले आहे. आणखी एक योगायोग म्हणजे ज्या वर्षी हा निबंध प्रकाशित झाला, त्याचवर्षी कार्ल मार्क्‍सचे ‘कॅपिटल’ही प्रकाशित झाले होते. तरीही विष्णुबुवांचे हे विचार अनेकांना स्वप्नरंजन वाटू शकेल, तसे ते आहेही, परंतु त्यांचे सर्व लेखन वाचल्यास धर्मजागृतीची त्यांची कळकळ जाणवल्यावाचून राहणार नाही.
वरील दोन्ही निबंध ज्यांना पूर्ण वाचायचे असतील त्यांच्यासाठी एक पुस्तिका उपलब्ध आहे. ‘विष्णुबावा ब्रम्हचारी ह्यांचे राजनीतिविषयक निबंध’ ही ती पुस्तिका. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाने ती प्रकाशित केली आहे.
माहिती सोर्स : लोकसत्ता