आठ शाळांमध्ये विज्ञान कृतीसत्राचे आयोजन

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    31-Aug-2023
Total Views |


Mangaon

सप्रेम नमस्कार. जय श्रीराम.
 
विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र आणि ‘स्व’-रूपवर्धिनी विज्ञान तंत्रज्ञान फिरती प्रयोगशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव, रोहा, सुधागड तालुक्यातील आठ शाळांमध्ये विज्ञान कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले होते.
 
२४ ऑगस्टला सकाळी १० वा. पहिल्या शाळेत म्हणजे कुंडलिका विद्यालय, पाटणुसच्या शाळेत पोहोचलो. श्री. राम मुंडे सर यांनी शाळेच्या समोर असलेल्या खजिना डोंगराचा इतिहास सांगितला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेहून लूट घेऊन स्वराज्यात परत येताना या डोंगरावर आपल्या सैन्यासह मुक्काम केला होता. एक रात्रभर खजिना तेथे होता म्हणून हा खजिना डोंगर
या शाळेत ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान कृतिसत्र घेण्यात आले. प्रयोगांतील नाविन्य आणि डॉ. सुहास काणे सर आणि डॉ. प्रमोद खांडेकर सर अशा मोठ्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन यामुळे मुलांमध्ये कमालीचा उत्साह होता. पुढील हि.म.मेथा माध्यमिक विद्यालय, विळा येथे ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान कृतिसत्र घेण्यात आले. येथे जोरदार पावसामुळे प्रयोगशाळेची बस मैदानात अडकून पडली, त्यामुळे न्यू इंग्लिश स्कूल, शिरवली व रायगड माध्यमिक विद्यामंदिर, कांदळगाव येथे सुरुवातीला छोटे प्रयोग व विज्ञान आणि गणितातील गमतीजमती सांगण्यात आल्या. बस आल्यानंतर कृतिसत्र घेण्यात आले. त्यादिवशीचा मुक्काम विष्णुबुवा ब्रम्हचारी सामाजिक केंद्राच्या शिरवली येथील कार्यालयात होता. येथे सर्व कार्यकर्त्यांनी विष्णुबुवा स्थापित श्रीदत्तगुरूंच्या पादुकांची आरती आणि पूजन केले. रात्री कांदळगावात भोजन झाल्यावर शिरवलीतील मंदिरात ग्रामस्थांबरोबर बैठक झाली. श्री. सुरेश गोखले यांनी विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्य ग्रामस्थांना सांगितले. नंतर ‘स्व’-रूपवर्धिनीची विस्तृत माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
 
दुसऱ्या दिवशी २५ ऑगस्टला सकाळी १० वा. आदर्श माध्यमिक विद्यालय, कुडली आणि सुशिलाताई पवार विद्यालय, भाले या शाळेतील विद्यार्थ्यांचे विज्ञान कृतिसत्र घेण्यात आले. शाळांमधील शिक्षकही आनंदाने या कृतीसात्रात सहभागी झाले होते. पुढे संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव येथे विज्ञान कृतिसत्र घेण्यात आले. त्यानंतर पाच्छापूर येथील माध्यमिक विद्यालय शाळेत विज्ञान कृतिसत्र घेण्यात आले. येथे प्रयोगशाळेची बस उभी करताना रस्त्याचा बाजूचा भाग खचल्यामुळे बसच्या एका बाजूचे पुढचे आणि मागचे चाक खड्ड्यात गेल्यामुळे गाडी बाहेर निघणे अशक्य झाले. ट्रॅक्टरने ओढूनही गाडी बाहेर निघाली नाही. त्यासाठी JCB मागवावा लागला परंतु तो दुसऱ्या दिवशी सकाळी आला त्यामुळे एक मुक्काम वाढवावा लागला. शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक माळी यांनी कार्यकर्त्यांची शाळेत राहण्याची आणि जेवणाची सोय करून मोलाचे सहकार्य केले. दुसऱ्या दिवशी २६ ऑगस्टला शनिवार असल्यामुळे शाळा सकाळी होती. मग तोही वेळ सत्कारणी लावत सकाळी खांडेकर सरांनी मुलांचा व्यायाम घेतला. तसेच विज्ञानाची इतर कृतीसत्रे घेण्यात आली. JCB आल्यावर गाडी काढण्यात आली व त्यानंतर परतीचा प्रवास सुरु झाला.
 
या तीन दिवसात डॉ. काणे सरांनी ‘अंटार्क्टिका एक आव्हान’ या विषयावर त्यांनी अंटार्क्टिकावर १ वर्ष राहून केलेल्या संशोधनावर आधारित सत्रे घेतली. डॉ. खांडेकर सरांनी कर्करोग विषयी माहिती व प्रतिबंधात्मक उपाय व योग या विषयावर सत्रे घेतली. आधुनिक मापन यंत्रांच्या साहाय्याने अंतर, प्रकाश, वजन, ध्वनी, रक्तदाब आणि माती परीक्षण यांविषयी मुलांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक देण्यात आले. आधुनिक आवर्तसारणी, अणूचे अंतरंग, रोबोटिक्स, हवेचे दाब, चुंबक, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक, केंद्रीय बल असे वेगवेगळे प्रयोग मुलांना करायला मिळाले. हे प्रयोग श्री विश्वास कुलकर्णी, श्री रवीराज पाटील, श्री योगेश तांबट, श्री बाप्पू शिंदे, श्री प्रताप घुटूकडे, श्री चंदन डाबी आणि श्री हेमंत देसाई यांनी घेतले .
 
या दोन दिवसांच्या कार्यक्रमाची सर्व व्यवस्था, नियोजन आणि संपर्क विष्णुबुवा ब्रम्हचारी सामाजिक केंद्राच्या कार्यकर्त्यांनी केला. यामध्ये श्री.सुनील जगताप, श्री. प्रभुदास घरत आणि केंद्राच्या अध्यक्ष डॉ. सुजाता बापट सहभागी होते. आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अनंतराव पालांडे यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. श्री. संजय तांबे आणि श्री मंगेश ढेबे यांनी खूप परिश्रम केले. सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विश्वस्तांनी मोलाचे सहकार्य केले.
 
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- विज्ञान तंत्रज्ञान फिरती प्रयोगशाळा
 
 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 
 
 
सुरेश गोखले
9579372797