पाणोसे कातकरी वाडी आणि रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

01 Jul 2025 11:13:24

Vishnubuva-bramhachari
 
🚩 विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 🚩
माणगाव, जिल्हा रायगड.
🙏 जय श्रीराम.
१९ व्या शतकातील महान समाजसुधारक आणि द्रष्टा संन्यासी विष्णुबुवा ब्रह्मचारी (१८२५-१८७१) यांनी आपल्या लेखणीतून आणि वाणीतून निरंतर सर्व जातिबांधवांना शिक्षण, महिलांना शिक्षण, कौशल्य विकास, कौशल्याधारित नोकरी-व्यवसायाची संधी, लोककल्याणकारी आदर्श राज्यव्यवस्था या विषयांचे प्रतिपादन केले. त्यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षण, आरोग्य, सेवा आणि संस्कार या क्षेत्रात विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र गेली ३ वर्षे सातत्याने कार्य करीत आहे.
 
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि कातकरी वाड्यांवर रोजगारासाठी कुटुंबासह होणारे स्थलांतर ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे कातकरी समाजातील मुलांच्या शिक्षणावर आणि एकूणच त्यांच्या भविष्यावर विपरित परिणाम होतो. ग्रामीण भागातील मराठी शाळांचा पट कातकरी जनजाती विद्यार्थ्यांंमुळे टिकून आहे. या मुलांची शाळेतील नियमित उपस्थिती वाढावी यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राकडून सलग तिसऱ्या वर्षी शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे.
 
सोमवार दि. ३० जून २०२५ ला माणगाव तालुक्यातील पाणोसे कातकरी वाडी आणि रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या दोन्ही शाळांमध्ये प्रारंभी केंद्राकडून शाळेला भेट देण्यात आलेल्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.
 
पाणोसे कातकरी वाडी शाळेमध्ये केंद्राच्या विश्वस्त आणि अनुभवी निवृत्त शिक्षिका सौ. प्रतिभाताई पोळेकर यांनी विद्यार्थ्यांकडून एक बालगीत साभिनय म्हणून घेतले. त्यांनी माणगाव तालुक्यातील अनेक केंद्रांवर आनंददायी शाळा कशी असावी याचे प्रशिक्षण दिले आहे. साभिनय गीत गाण्यात मुले रममाण झाली होती. शाळेतील शिक्षक श्री. महाडिक आणि श्री. मढवी या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.
 
पाणोसे गावच्या उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागतगीत सादर केले. काही विद्यार्थ्यांनी कातकरी भाषेतील गीते गायली. केंद्राचे सचिव श्री. सुरेश गोखले यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यामागील उद्देश विशद करून सांगितला. पालकांबरोबर स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले की मुलांनी पालकांबरोबर स्थलांतरित न होता वाडीवरील आपल्या नातेवाईकांसोबत रहावे, शिक्षणात खंड पडू देऊ नये. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन काही विद्यार्थ्यांनी आम्ही वाडीवरच राहू, शाळेला नियमित येऊ असे मान्य केले. अशा विद्यार्थ्यांचा केंद्राद्वारे उचित पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल, असे श्री. गोखले यांनी मुलांना सांगितले. मुलांच्या पालकांशी संवाद यासंबंधात चर्चा करण्यासाठी शिक्षकांनीही संमती दर्शविली आहे.
 
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. विद्या पवार, शिक्षक श्री. केकान आणि श्री. खैरे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
शुभं भवतु । 🌺🌻🌷 
 
 
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- कातकरी वाडी आणि रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
Powered By Sangraha 9.0