१५ ऑगस्ट २०२५
शिरवली हे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे जन्मगाव. येथून जवळच थरमरी ही कातकरी वाडी आहे.या वाडीवर केंद्राच्या कार्यकर्त्यांचा दिवाळी फराळ, शैक्षणिक साहित्य वाटप, शाळा संपर्क निमित्ताने संपर्क आहे.
कार्यकर्त्यांनी श्रीकृष्णजन्म उत्सवाच्या पर्वात थरमरी कातकरी वाडीवर जायचे ठरवले होते. यावेळी एक विशेष भेट जुळून आली. वॉशिंग्टन (अमेरिका) येथे स्थायिक झालेल्या, विष्णुबुवांच्या कार्याच्या हितचिंतक सौ. शुभांगी पेठे माणगावला आल्या होत्या आणि त्या वाडीवर येणार होत्या.
सर्वांनी शनिवार, १६ ऑगस्ट २०२५ ला सकाळी शिरवली येथे विष्णुबुवा ब्रह्मचारी स्थापित श्रीदत्तगुरू पादुकांचे दर्शन घेतले. सोबत केंद्राच्या कार्यकर्त्या सौ. समृद्धी माने, सौ. अनुष्का पाटणे, सौ. मंदा मोहिते, सौ. सुलभा गोखले, कु. मानसी काते आणि श्री. संजयजी माने होते.
नंतर सर्व जण थरमरी वाडीवर पोहोचले. यावेळी ९० मुलं-मुली, कातकरी बांधव, श्री. बनसोडे सर, ‘अनुलोम ’ या स्वयंसेवी संस्थेचे रायगड जिल्हा प्रमुख श्री. रमेशजी ढेबे उपस्थित होते. श्री. सुरेश गोखले यांनी मुलांकडून ‘पंढरीच्या वारीला वारकरी चालला’ हा अभंग म्हणून घेतला आणि विद्यार्थी, बंधुभगिनींशी संवाद साधला. वाडीवर मंदिर बांधण्यासंबंधी गावकऱ्यांशी चर्चा केली. गावात देवाचे अधिष्ठान आले की समाजात चांगले बदल होतात, मुलांवर चांगले संस्कार होतात, व्यसनाधीनता कमी होते आणि गावाचा विकास होतो असे सांगितले.
सौ. शुभांगीताईंनी कृष्णाष्टमीच्या निमित्ताने ‘छोटी छोटी गैयां छोटे छोटे ग्वाल’ हे गीत सांगितले.सर्व मुले आनंदाने आणि उत्साहाने गीत गाण्यात रममाण झाली होती. मुलांशी बोलताना श्री. रमेश ढेबे यांनी राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांच्या उदाहरणातून शिक्षणाचे महत्त्व, हुतात्मा नाग्या कातकरी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाची कहाणी सांगितली. श्री. बनसोडे सरांनी वाडीवरील मोठ्या मुलांनी शाळेत नियमित शाळेत जावे असे आग्रहाने सांगून आधार कार्ड, जन्म दाखला मिळण्यासंबंधी येणाऱ्या अडचणी सांगितल्या.
सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. नंतर प्रसाद वाटप आणि रक्षाबंधन करण्यात आले.
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- रक्षाबंधन उत्सव